Champions Trophy 2025: क्रिकेट विश्वाचे लक्ष विराटवर! इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर कोहली

WhatsApp Group

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू झाली आहे. भारताला आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना २० फेब्रुवारी रोजी दुबई येथे होईल. हा सामना जिंकून टीम इंडिया स्पर्धेची चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला या सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे.

बांगलादेशविरुद्ध विराट कोहलीचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय स्वरूपात १६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७५.८३ च्या सरासरीने आणि १०१.७८ च्या स्ट्राईक रेटने ९१० धावा केल्या आहेत. या काळात त्याने पाच शतके आणि तीन अर्धशतकेही झळकावली आहेत. अशा परिस्थितीत, जर विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध आणखी ९० धावा केल्या तर तो या संघाविरुद्ध या फॉरमॅटमध्ये १००० धावा करणारा पहिला भारतीय ठरेल. या यादीत त्याच्यानंतर रोहित शर्माचा क्रमांक लागतो. या संघाविरुद्ध त्याने १७ एकदिवसीय डावांमध्ये ७८६ धावा केल्या आहेत.

बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झिम्बाब्वेचा माजी फलंदाज ब्रेंडन टेलरच्या नावावर आहे. त्याने ५६ सामन्यांपैकी ५५ डावात १५०८ धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकारा (१२०६ धावा) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वेचा एल्टन चिगुम्बुरा तिसऱ्या स्थानावर आहे तर हॅमिल्टन मसाकाड्झा (११८९) चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या (१०३०) पाचव्या स्थानावर आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, २०२५ साठी भारताचा सुधारित संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.