India Vs Pakistan: ‘किंग’ कोहलीचं वादळी शतक; पाकिस्तान संघाला चोपचोप चोपलं, भारताचा सहा गडी राखून विजय

WhatsApp Group

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळला गेला. पाकिस्ताननं भारताला विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतान हा सामना 6 गडी राखत जिंकला आहे. ‘किंग’ कोहलीनं या सामन्यात दमदार फलंदाजी करत शतक ठोकलं.

भारताकडून फलंदाजी करताना पहिला धक्का पाचव्या षटकात 31 धावांवर असताना बसला. शाहीन आफ्रिदीने रोहितला फुलर लेन्थ बॉलने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर 18 व्या षटकात 100 धावसंख्येवर दुसरा धक्का बसला आहे. फिरकी गोलंदाज अबरार अहमदने शुभमन गिलला क्लीन बोल्ड करत तंबूत पाठवलं. गिल 52 चेंडूत 7 चौकारांसह फक्त 46 धावा करू शकला. त्यानंतर अय्यरनंही त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र यानंतर तो आक्रमक फटका मारण्याच्या नादात बाद झाला.

पाकिस्तानची फलंदाजी

पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 49.4 षटकांत 241 धावांची मजल मारली. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी रचलेल्या शतकी भागिदारीनंतरही, भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या डावाला ब्रेक लावला. या सामन्यात मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी रचली. अक्षर पटेलनं रिझवानचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. रिझवानचं अर्धशतक चार धावांनी हुकलं. मग हार्दिक पांड्याने सौद शकीलला 62 धावांवर माघारी धाडलं. त्यामुळं 2 बाद 151 धावांवरून पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान ऑलआऊट झाली.

भारताची गोलंदाजी

गोलंदाजीत भारतीय संघासाठी मधल्या षटकांमध्ये कुलदीप यादवने वर्चस्व गाजवले. यादवने 9 षटकांच्या स्पेलमध्ये 40 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्याने प्रथम फॉर्ममध्ये असलेल्या सलमान आगाची विकेट घेतली, जो फक्त 19 धावा करून बाद झाला. त्याने शाहीन आफ्रिदीलाही गोल्डन डकवर बाद केले आणि कुलदीपने नसीम शाहचा तिसरा बळी घेतला, ज्याने 14 धावा केल्या. त्याच्याशिवाय भारताकडून हार्दिक पंड्याने दोन विकेट घेतल्या. तर हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, हर्षित राणा.

पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, सलमान आघा, सौद शकील, इमाम-उल-हक, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.