Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार

WhatsApp Group

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार आहे. टीम इंडिया पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेतील आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. भारतीय संघाला अ गटात ठेवण्यात आले असून, रोहितची सेना पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याशी खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटात स्थान देण्यात आले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आयसीसीने पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बीसीसीआयने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हायब्रीड मॉडेलमध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय संघ दुबईत आपले सर्व सामने हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळणार आहे. जर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली तर जेतेपदाचा सामना दुबईत होणार आहे. जर रोहितची सेना अंतिम फेरीत पोहोचली नाही, तर अशा परिस्थितीत स्पर्धेतील फायनल सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल.

टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशशी

भारतीय संघ 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. यानंतर 23 फेब्रुवारीला दुबईच्या मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यातील महान सामना रंगणार आहे. पाकिस्तानचा सामना केल्यानंतर टीम इंडिया 2 मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे.

जर भारतीय संघ गट टप्प्यात दमदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर रोहितची सेना दुबईत 4 मार्च रोजी या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळेल. यावेळी अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. म्हणजेच पावसामुळे 9 मार्चला सामना पूर्ण झाला नाही, तर या स्थितीत उर्वरित सामना 10 मार्चला होणार आहे.