नवी दिल्ली: देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आजचा शनिवार आनंदाची बातमी घेऊन आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती, त्यावर अखेर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात (DA) २ टक्क्यांनी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे आता हा भत्ता ६० टक्क्यांवर पोहोचला आहे.
भत्त्याचा टप्पा आता ६० टक्क्यांवर
साधारणपणे जानेवारी महिन्यापासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा मार्चमध्ये केली जाते. मात्र, यंदा एप्रिल महिना उजाडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांना ५८ टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता, जो आता २ टक्क्यांच्या वाढीनंतर ६० टक्के झाला आहे. वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती कायम राहावी आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा ढासळू नये, यासाठी सरकार वर्षातून दोनदा (जानेवारी आणि जुलै) अशा प्रकारची वाढ करत असते.
८ व्या वेतन आयोगाच्या हालचाली आणि फिटमेंट फॅक्टरची मागणी
एककीडे महागाई भत्ता वाढला असतानाच, दुसरीकडे कर्मचारी संघटनांनी ८ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव वाढवला आहे. ‘नॅशनल कौन्सिल-जेसीएम’ने (NC-JCM) सरकारकडे सादर केलेल्या प्रस्तावात ‘फिटमेंट फॅक्टर’ ३.८३ पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. जर सरकारने ही मागणी मान्य केली, तर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८,००० रुपयांवरून थेट ६९,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. याशिवाय, पगाराच्या गणनेत ‘कुटुंब’ या व्याख्येची व्याप्ती वाढवून त्यात आश्रित पालकांचा समावेश करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
नौकानयन क्षेत्रासाठी ‘सॉवरेन मॅरीटाइम फंड’ला मंजुरी
केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारातच नव्हे, तर देशाच्या पायाभूत सुविधा आणि सागरी सुरक्षेसाठीही मंत्रिमंडळाने मोठी तरतूद केली आहे. भारतीय जहाजांना परवडणारे आणि स्थिर विमा संरक्षण मिळावे यासाठी १३,००० कोटी रुपयांच्या ‘सॉवरेन मॅरीटाइम फंड’ला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठी मदत होणार आहे.
ग्रामीण रस्ते योजनेचा विस्तार
ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’ (PMGSY) २०२८ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी जाहीर करण्यात आला असून, यामुळे दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटीला अधिक वेग मिळणार आहे.
