क्रिकेट विश्वात शोककळा, भारताला पहिला कसोटी विजय मिळवून देणारा खेळाडू हरपला!

WhatsApp Group

CD Gopinath passes away age 96

चेन्नई: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या पहिल्या कसोटी विजयातील शेवटचा जिवंत दुवा निखळला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू चिंगलपुट डोराईकन्नू गोपीनाथ (सी. डी. गोपीनाथ) यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. चेन्नईतील अड्यार येथे आपल्या मुलीच्या निवासस्थानी त्यांनी गुरुवारी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. १९५२ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताला पहिला ऐतिहासिक कसोटी विजय मिळवून देण्यात गोपीनाथ यांचा सिंहाचा वाटा होता. त्या विजयाचा अनुभव सांगणारे ते एकमेव जिवंत सदस्य होते, मात्र आता त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

इंग्लंडविरुद्ध गाजवले होते मैदान

१९३० मध्ये मद्रास (चेन्नई) येथे जन्मलेल्या सी. डी. गोपीनाथ यांनी १९५१ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. उजव्या हाताचे फलंदाज असलेल्या गोपीनाथ यांनी १९५१-५२ च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आपली छाप सोडली होती. मालिकेतील दुसऱ्या कसोटीत त्यांनी नाबाद ५० आणि ४२ धावांची खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे, चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या ऐतिहासिक कसोटीत त्यांनी ३५ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले होते, ज्या सामन्यात भारताने कसोटी इतिहासातील आपला पहिला विजय नोंदवला होता.

मैदानाबाहेरही बजावली मोठी जबाबदारी

गोपीनाथ यांनी केवळ भारतासाठीच नाही, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मद्रास संघाचे नेतृत्वही केले होते. ८३ प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी ४२.१६ च्या सरासरीने ४२५९ धावा केल्या होत्या, ज्यात २३४ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय निवड समितीचे (नॅशनल सिलेक्टर) सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच १९७९ च्या इंग्लंड दौऱ्यावर ते भारतीय संघाचे व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या निधनावर बीसीसीआयसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला आहे.