अखेर जातीभेद दूर झाला, त्र्यंबकेश्वरमधील आक्षेप घेतलेली गावजेवणातील वेगळी पंगत झाली बंद!

WhatsApp Group

त्र्यंबकेश्वर येथील मागील शेकडो वर्षांपासूनची ग्रामदेवता महादेवीच्या नावाने सुरु केलेली गाव जेवणाची परंपरा अद्याप सुरु आहे. परंतु विशिष्ट जातीतील व्यक्तींना वेगळा स्वयंपाक करण्याची व जेवणासाठी वेगळी पद्धत बसण्याची परंपरा बंद झाली आहे. त्र्यंबकेश्वरमधील महादेवी ट्रस्ट कडून आयोजित ह्या गावजेवणाचे प्रायोजन केले जाते. त्यामध्ये साधारण दहा हजार लोक जेवण करतात.मात्र  गावातील एका विशिष्ट समाजाच्या भोजनासाठी लागणारे अन्न लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतूनच खरेदी केलेल्या अन्नातून वेगळे शिजवले जाते व या विशिष्ट समाजाची भोजनाची पंगत इतर बहुजन समाजबांधवापासून वेगळी बसते,असे महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या कार्यकर्त्यांना कळाले.

सदर गावजेवण हे रविवार दि. २३ एप्रिल, २०२३ रोजी होणार असल्याचे समजले होते .लोकांच्या इच्छेने गावजेवण होत असेल तर त्याला विरोध न करता, ह्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी येणारे सर्व गावकरी हे एकाच ठिकाणी शिजवलेल्या आणि एकाच पंगतीत वाटप होत असलेल्या अन्नाचा लाभ घेतील,ही भूमिका अंनिसने घेतली. त्याआशयाचे निवेदन तहसिलदार, त्र्यंबकेश्वर व पोलिस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर यांना एक दिवस अगोदर दिले. त्यांच्याशी ह्या पंगतीभेदाबाबत सविस्तर चर्चा केली. गावजेवणात एका विशिष्ट समाजासाठी वेगळ्या ठिकाणी अन्न शिजवणे व त्यांची वेगळी पंगत बसविणे,ही अनिष्ट, अमानवीय ,राज्य घटनेशी विसंगत असून, सामाजिक विषमतेला बळ देणारी बाब आहे, हे तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना तोंडी तसेच लेखी निवेदनातून अंनिसचे राज्य प्रधान सचिव डाॅ. ठकसेन गोराणे,राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, डाॅ.सुदेश घोडेराव, अॅड समीर शिंदे, संजय हरळे यांनी स्पष्ट केले.

तहसिलदार यांनी संबंधित ट्रस्टींना बोलावून घेऊन, समज दिली. पोलिस प्रमुखांनीही कायद्याचे पालन करून, एकोप्याने राहून, सर्वांनी एकाच पंगतीत भोजनाचा आनंद घ्यावा, ह्या अंनिसच्या विचाराला पाठिंबा दिला. त्यानंतर ट्रस्टींनीही योग्य तो निर्णय घेऊन ,सर्वांनी एकच पंगतीत भोजन घेण्यासाठी सर्वांना आवाहन केले .त्यामुळे वर्षानुवर्षं चालत आलेली विशिष्ट समाजाची वेगळी पंगत बसण्याची प्रथा ह्या सर्वांच्या प्रयत्नातून संपुष्टात आली.

पुढाकार जरी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतला तरी त्यासाठी तहसिलदार, पोलिस निरीक्षक व त्यांचे सहकारी, महादेवी ट्रस्ट यांनी मोठे धाडस दाखवले आहे. ज्या ज्या ठिकाणी कोणत्याही कारणास्तव माणसामाणसात भेद केला जात असेल तो सूज्ञांनी पुढे होऊन थांबविला पाहिजे, असे आवाहन यावेळी अंनिसच्या वतीने करण्यात आले. “गाणजेवण पंक्तीभेद होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले होते. तशा प्रकारच्या तक्रारी स्थानिक भाविकांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा शाखेला सोबत घेऊन प्रशासन व ट्रस्टींशी सुसंवाद केला. त्यातुन हे परिवर्तन झाले आहे.अंनिस याचे स्वागत करत आहे