नारायण राणेंच ‘ते’ वक्तव्य अंगलट? टीम नड्डात स्थान नाकारलं

WhatsApp Group

नवी दिल्ली – देशातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्यासह प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुद्धे ,चित्रा वाघ यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र, कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan rane ) यांना स्थान देण्यात आलेलं नाही.

भाजपच्या पक्षांतर्गत राजकीय व्यवहारात महत्वाचे स्थान असलेल्या कार्यकारणीत राणेंना डावलल्याने मोठा धक्का मानला जात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुका राणेंच्या नेतृत्वाखाली लढविण्याच्या चर्चांना ‘ब्रेक’ बसला आहे.

नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील जन आशीर्वाद यात्रा मोठ्या प्रमाणावर वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे राणेंना कार्यकारणीत स्थान देण्यावरुन पक्षाने ‘आस्ते कदम’चे धोरण स्वीकारल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी वर्तविले आहे.

टीम नड्डात वाघ ‘इन’:

भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा ( president of the Bharatiya Janata Party J. P. Nadda ) यांनी घोषित केलेल्या कार्यकारणीत चित्रा वाघ यांना स्थान देण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चित्रा वाघ यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलने हाती घेतली होती. थेट मुख्यमंत्र्यावर निशाणा साधत महिला अत्याचाराचा मुद्दा अग्रस्थानी आणला होता. वाघ यांच्या कारभाराची दखल घेऊन थेट राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान दिलं आहे.

ज्योतीरादित्यांना मानाचं पान:

काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे ( Jyotiraditya Scindia ) यांना कार्यकारणीत स्थान देण्यात आलं आहे. नड्डा यांच्या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील ‘हे’ चेहरे:

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणी, संजू वर्मा, हिना गावित, जमाल सिद्धिकी, विनोद तावडे, पंकजा मुंडे , सुनील देवधर