मिरजमध्ये दोनशे एकर ऊस जळून खाक, कोट्यावधीचे नुकसान

WhatsApp Group

टाकळी – ढवळी ता. मिरज येथे शनिवारी दुपारच्या दरम्यान दोनशे एकर ऊस शेतीला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी वेळीच घरातील नागरिकांना व गोठ्यातील जनावरांना बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

ढवळी-वड्डी कुटवाड रस्ता येथील काही शेतकऱ्यांच्या ऊसाच्या शेतीला आग लागली आहे. ही आग काही क्षणातच शेजारील अन्य उसाच्या शेतापर्यंत पोहोचली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र आगीने थोड्याच अवधीत रुद्रावतार धारण केले होते. दोन तासात बघता बघता ही आग परिसरातील सुमारे दोनशे एकर ऊस शेतांमध्ये पसरली.

अग्निशमन दल फौजफाट्यासह घटनास्थळी त्वरित दाखल झाले. आग लागलेल्या परिसरामध्ये काही नागरिकांची घरे व जनावरांचे गोठे आहेत. शेतानजीक त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना आगीचा धोका होता. यामुळे अग्निशमन दलाचे जवान लिंगप्पा कांबळे अमोल गडदे व तानाजी पाटील यांनी घरातील सर्व नागरिक व गोठ्यातील जनावरांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले.