नराधमांचा ‘ऑन द स्पॉट’ हिशोब! 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्येचा प्रयत्न; 3 तासांत पोलिसांनी घातली गोळी

WhatsApp Group

बुलंदशहर (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबाद भागात एका ४ वर्षांच्या निष्पाप बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अवघ्या तीन तासांत चकमकीनंतर अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात दोन्ही नराधम जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ४ वर्षांची ही मुलगी संध्याकाळपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी बराच शोध घेतल्यावर घराच्या पाठीमागील भागात तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. तपासात समोर आले की, मुलीवर आधी पाशवी अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करून मृतदेह शेतात फेकून देण्यात आला. मुलीच्या वडिलांनी त्यांच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या दोन तरुणांवर संशय व्यक्त केला होता.

अवघ्या ३ तासांत एनकाउंटर

वडिलांच्या तक्रारीनंतर सिकंदराबाद पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. तपासादरम्यान पोलीस पथकाने कांवरा रोडवरील एका निर्माणाधीन कॉलनीची घेराबंदी केली. तिथे लपून बसलेल्या आरोपींनी पोलिसांना पाहताच त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन्ही आरोपींच्या पायाला गोळ्या लागल्या, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

आरोपींची ओळख

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे राजू आणि वीरा कश्यप अशी आहेत. हे दोघेही उत्तर प्रदेशातील लखीमपूर आणि बलरामपूर येथील रहिवासी असून पीडितेच्या घरी भाड्याने राहत होते. अटक केल्यानंतर प्राथमिक चौकशीतच या नराधमांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी तक्रार मिळाल्यापासून अवघ्या १८० मिनिटांत गुन्हेगारांचा शोध लावून त्यांना जेरबंद केले.