गांधीजींनी भगतसिंग आणि नेताजींना पाठिंबा दिला नाही, थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नसतं- कंगना
नवी दिल्ली – आपल्याला मिळालेले स्वातंत्र हे एक भीक होती आणि आपल्या भारत देशाला खरे स्वातंत्र्य हे 2014 मध्येच मिळाल आहे, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतवर देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, कंगनाने आता तर थेट महात्मा गांधी यांच्यावरच निशाणा साधला आहे. गांधीजींनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना पाठिंबा दिला नसल्याचा आरोप केला आहे. तसेच थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नसतं, अशी पोस्ट कंगनाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
कंगनाने मंगळवारी एका जुन्या वृत्तपत्रातील एक लेख शेअर करत लिहिले आहे की, ‘एकतर तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक, एकाच वेळी तुम्ही दोघांचेही समर्थक असू शकत नाही. कंगणाने शेअर केलेला लेख हा 1940 च्या दशकातील एका जुन्या वृत्तपत्रातील आहे.
गांधीजींनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना पाठिंबा दिला नाही
कंगना रणौतने आपल्या स्टोरीवर पोस्ट केले आहे की, गांधीजींनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना समर्थन दिले नाही. याचे खूप पुरावे आहेत. त्यामुळे कोणाला समर्थन करायचे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. या सर्व गोष्टी मनात ठेऊन फक्त जयंतीला शुभेच्छा देणं पुरेसे नाही. खरं तर या बाबतीत मौन राखणे बेजबाबदारपणा आहे. सर्वांना त्यांचा इतिहास आणि आदर्शांबद्दल माहिती असणं गरजेच आहे, असे कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.