
मुंबई : गणेशोत्सव (Mumbai Ganeshotsav) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे मुंबई महापालिकेने मंडळांसाठीची नियमावली (BMC Rules) जाहीर केली आहे. गणेशमूर्तींच्या उंचीबाबतचे निर्बंध हटल्यानंतर तसेच कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतरचा हा पहिलाच निर्बंधमुक्त गणेशोत्सव आहे. पालिकेची कोरोना काळापूर्वीची जुनीच नियमावली यंदाच्या गणेशोत्सवात लागू असणार आहे. गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध नसले तरी मंडप मात्र 30 फूट उंचीपर्यंतचेच असावेत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
25 फुटांपेक्षा उंच मंडप असेल तर मंडप बांधणीचा अहवाल पालिकेला सादर करणं गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक असणार आहे. मंडप बांधणीमुळे गणेशोत्सवानंतर खड्डा आढळल्याच प्रती खड्डा दोन हजार रुपयांचा दंड आकरला जाणार आहे. सार्वजिनक गणेशोत्सव मंडळात प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावणाऱ्या मंडळांवर पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे.
काय आहेत नव्या अटी?
- मंडपाची उंची 30 फुटांपर्यंतच ठेवणं बंधनकारक असेल.
- मंडप परिसरात खड्डे आढळल्यास 2 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.
- मंडपामध्ये कोणताही स्टॉल उभारता येणार नाही.
- 25 फुटांवरील मंडपांचे बांधणी अहवाल सादर करणं बंधनकारक असेल.
- पीओपीच्या गणेशमुर्तींवर उंचीच्या मर्यादेचं बंधन नसेल.
- प्रतिबंधीत जाहिराती मंडपात लावल्यास कारवाई होईल.
- साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेता स्वच्छतेची जबाबदारी गणेश मंडळांची असेल.
- स्पीकर, डीजेच्या आवाजाची डेसीबल मर्यादा पाळणं बंधनकारक असेल.