या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले. भाजपनं जिल्हा बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केलं असलं, तरी जिल्हाध्यक्ष राजन तेलींच्या पराभवाचा धक्काही भाजपला बसला आहे. २००८ ते २००९ या ११ वर्षांच्या कालावधीत नारायण राणेंचं या बँकेवर वर्चस्व होतं. ही सत्ता पुन्हा काबिज करण्यासाठी राणे पिता-पुत्रांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली होती.
प्रतिष्ठेच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. बँकेच्या एकूण १९ जागांपैकी ११ जागा केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या भाजपप्रणीत सिद्धिविनायक पॅनेलनं काबिज केल्या. तर महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेलला ८ जागांवर समाधान मानावं लागलं. बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा भाजपच्या विठ्ठल देसाईंनी पराभव केला आहे. या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली होती. त्यामुळे अखेर चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार ठरवण्यात आला. २०१९ साली भाजपसोडून शिवसेनेत दाखल झालेल्या विद्यमान अध्यक्षांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे.
शिवसेनेनं गड गमावला, भाजपची वापसी!
• कणकवलीतून भाजपचे विठ्ठल देसाई विजयी, विद्यमान अध्यक्ष सतीश सावंतांचा पराभव
• भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली पराभूत, तर शिवसेनेचे सुशांत नाईक विजयी
• भाजपचे मनीष दळवी विजयी, काँग्रेसच्या विलास गावडेंचा पराभव
• भाजपचे समीर सावंत, मधुसुदन गावडे, अतुल काळसेकर, दिलीप रावराणे, बाबा परब, प्रकाश बोडस, महेश सारंग विजयी
• रवींद्र मडगावकर, प्रज्ञा ठवण या भाजप उमेदवारांचाही विजय
• काँग्रेसचे विद्याप्रसाद बांदेकर, शिवसेनेचे गणपत देसाई विजयी
• राष्ट्रवादीचे विक्टर डांटस विजयी
• महाविकास आघाडीच्या नीता राणे विजयी, भाजपच्या अस्मिता बांदेकर पराभूत
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेंवर सत्ता कायम ठेवण्यासाठी नेत्यांची मोठी फळी प्रचारासाठी महाविकास आघाडीनं मैदानात उतरवली होती. संतोष परब हल्लाप्रकरणामुळे राणे पिता-पुत्र बॅकफूटवर जातील की काय अशी शंका होती. मात्र, आज हाती आलेल्या निकालांमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला. विद्यमान अध्यक्षांसह उपाध्यक्षांनाही पराभव स्वीकारावा लागला. या निकालांमुळे तळकोकण हा राणेंचाच गड असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. आत्तापर्यंत नॉट रिचेबल असलेल्या नितेश राणेंनी पहिल्यांदाच विजयानंतर समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘गाडलाच’ या त्यांच्या ट्विटवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सिंधुदुर्गात ठिकठिकाणी गुलाल उधळून, आतषबाजीनं कार्यकर्ते विजयाचा आनंद साजरा करत आहेत.
आगामी काळात सिंधुदुर्गात नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहे. त्यापूर्वी बँकेतील हे सत्तांतरण भविष्यातील बदलांची नांदी ठरू शकते. भाजपच्या या विजयामुळे तळकोकणात शिवसेनेची पुढची वाटचाल बिकट ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीनं सपाटून मार खाल्ला होता. त्यातच आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची गेलेली सत्ता चुकलेल्या रणनितींवर विचार करायला महाविकास आघाडीला भाग पाडणार आहे.