भाजप आमदार सुरेश धस यांना उच्च न्यायालयाचा दणका, दरोड्याचा गुन्हा दाखल

WhatsApp Group

बीड – भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस ( Suresh Dhas Bjp Mla ) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा दणका मिळाला आहे. आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आठ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये 395 कलम वाढवण्याच्या आदेशाने सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आष्टी तालुक्यामधील मनोज चौधरी यांच्या पत्नी, माधुरी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 8 महिन्यांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे.

आमदार सुरेश धस यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने आपल्या घरांची संरक्षक भिंत पाडून संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले, अशी फिर्याद माधुरी चौधरी यांनी दिली होती. यावरून पोलिसांनी 143,147,148,149, 427, 336 आणि 379 ही कलमे लावली होती.

मात्र त्यांनतर फिर्यादी चौधरी यांनी कलमामध्ये वाढ करण्यात यावी. ही मागणी घेऊन औरंगाबाद खंडपीठामध्ये रिट दाखल केली होती. त्यांनतर कलमामध्ये वाढ करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात आले आहेत.

काय प्रकरण आहे?
आठ महिन्यांपूर्वी आष्टीमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुरेश धस यांच्या पॅनलविरोधात माधुरी चौधरी या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्याचा राग मनात धरुन सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी माधुरी चौधरी यांचे पती मनोज चौधरी यांना मानसिक त्रास दिला, अशी तक्रार माधुरी यांनी केली होती. तसेच, 19 जुलै रोजी धस आणि त्यांच्या समर्थकांनी चौधरी यांचे घर आणि हॉटेलची तोडफोड देखील केली, असा आरोप सुरेश धस यांच्यावर आहे.