सिंधुदुर्ग – विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. कश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर कश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर सामाजिक तसंच राजकीय स्तरावर वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात आल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनीदेखील आता मोठा निर्णय घेतला आहे. नितेश राणे यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी तरुणांना तिकिटामध्ये खास सवलत दिली आहे.
राणे यांनी कणकवली मधील महाविद्यालयीन तरुण- तरुणींना खास ऑफर दिली असून लक्ष्मी थिएटरवर हा चित्रपट फक्त १०० रुपयांमध्ये पाहता येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ च्या शो दरम्यान तिकिटामध्ये ही खास सवलत असणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी फायदा घ्यावा, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे.
#kashmirifiles @BJP4Maharashtra pic.twitter.com/ovzsi9xjKH
— nitesh rane (@NiteshNRane) March 17, 2022
याआधी नितेश राणे यांनी हा चित्रपट राज्यामध्ये करमुक्त करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच भाजपाच्या काही नेत्यांनीही हा चित्रपट करमुक्त करण्यासाठी राज्य सरकारला निवेदन दिलं होतं. मात्र राज्य सरकारने ही मागणी फेटाळून लावली होती. उलट केंद्र सरकारनं हा चिपत्रट संपूर्ण देशातच करमुक्त करावा. असं केले तर कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हा चित्रपट पाहता येईल, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये मांडले होते.