मुंबई – आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी किरीट सोमय्या हजर राहणार आहेत. या प्रकरणी त्यांची सलग चार दिवस चौकशी होणार असल्याची सूत्रांकडून देण्यात आली आहे. किरीट सोमय्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले होते.
विक्रांत आयएनएस निधी अपहार प्रकरणामध्ये किरीट ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये किरीट सोमय्यांविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले गेले.
त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र निल सोमय्या यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. तसेच मुंबई मनपा कोरोना केस संदर्भात आज दुपारी एक वाजता किरीट सोमय्या आझाद मैदान पोलीस स्टेशनला ही जाणार आहेत.
किरीट सोमय्यांना हंगामी दिलासा
‘आयएनएस विक्रांत’ या विमानवाहू नौकेबाबतच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप असलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीच्या अटीवर अटकेपासून अंतरिम संरक्षण देत २८ एप्रिलपर्यंत हंगामी दिलासा देण्यात आला.
त्याचवेळी किरीट सोमय्या यांनी तपासात सहकार्य करावे आणि १८ एप्रिलपर्यंत सलग चार दिवस सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेमध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी उपस्थित रहावे, असे न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी आपल्या अंतरिम आदेशामध्ये स्पष्ट केले.