मुंबई – भाजपाचे नेते किरीट सोमय्या कोल्हापूरमध्ये गेले तिथे राडा झाला. त्यानंतर पुण्याला गेले तिथेही राडा झाला. त्यानंतर रायगडला गेले आणि तिथेही वाद निर्माण झाला आणि आता आज किरीट सोमय्या रत्नागिरीतल्या दापोलीच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यातही वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
कोकणातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापलेलं दिसतं आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान, किरीट सोमय्या आज सकाळीच दापोली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक मोठा हातोडा प्रसारमाध्यांसमोर दाखवला आहे. हा हातोडा जनतेच्या भावनेचे प्रतिक असल्याचं कीरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. जनता असाच हातोडा घेणार आणि यांना बाहेरचा रस्ता दाखवणार. साडेबारा कोटी जनतेचा हा हातोडा असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
मंत्री अनिल परब यांचे रत्नागिरीमधील रिसॉर्ट हे बेकायदेशीर असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी आज चलो दापोलीचा नारा दिला आहे. शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकरांचा बंगला तोडला आता अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडूयात असंही ते म्हणाले आहेत. आम्ही जनतेची भाषा बोलतो. जनतेची ताकद दाखवायला मी दोपीलाला जात आहे, असंही किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं आहे.