पॉलिटिकल टुरिझम भाजपच्या पथ्यावर, चंद्रशेखर बावनकुळेंचा दणदणीत विजय

WhatsApp Group

विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारत अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. गेल्या विधानसभा निवडणुकीत कामठी मतदारसंघातून बावनकुळेंना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आलं होते. तेव्हापासून राजकीय पूनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या बावनकुळेंचा हा कमबॅक ‘नेव्हर गो बॅक’ वाला असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी विजयाचा गुलाल उधळला. या निवडणुकीत बावनकुळेंना ३६२ मतं मिळाली. काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल रवींद्र भोयर यांना अवघं १ मत मिळालं. नागपूर विधान परिषद निवडणुकीत एकुण ५४९ मतं वैध धरली. त्यापैकी विजयासाठी २७५ मतांचा टप्पा गाठणं आवश्यक होतं. भाजप आणि सहयोगी पक्षांकडे ३१८ मतं होती. अशातच बावनकुळेंना ३६२ मतं मिळाल्यानं ४०च्या वर मतं फुटल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून कामठी मतदारसंघातून तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. तेव्हापासून आजतागायत बावनकुळे राजकीय पूर्नवसनाच्या प्रतीक्षेत होते. अखेर आज त्यांची ही प्रतिक्षा संपली आणि ते विधान परिषदेचे आमदार झाले. या निकालानंतर बावनकुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडून रडले. स्वत:च्या विजयापेक्षा बावनकुळेंच्या विजयानंतर जास्त आनंद झाल्याची प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली. ‘चंद्रशेखर बावनकुळेंचा कमबॅक नेव्हर गो बॅक वाला’ असल्याचंही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दिग्गज नेत्यांच्या स्वगृही झालेल्या या वजनदार निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. नागपूर पदवीधर मतदार संघातून भाजप उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव ध्यानी ठेवून यावेळी भाजपकडून निवडणुकीत विशेष खबरदारी बाळगण्यात आली. दगाफटका टाळण्यासाठी भाजपने मतदार नगरसेवकांना १० दिवसांच्या सहलीला पाठवले होते. १० डिसेंबरला थेट मतदानाच्या दिवशीचं नगरसेवकांना नागपुरात आणण्यात आलं. यामुळे भाजपनं घोडेबाजार करुन ही निवडणूक जिंकल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

एकीकडे पॉलिटिकल टुरिझम भाजपच्या पथ्यावर पडलं असताना पक्षातील गटबाजीचा काँग्रेसला फटका बसला. या निवडणुकीसाठी भाजपकडून आयात उमेदवार राजेंद्र भोयर यांना सुरवातीला काँग्रेसकडून तिकीट देण्यात आलं होतं. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. शेवटच्या क्षणाला खेळलेली ही काँग्रेसची खेळी सपशेल फोल ठरली.

नागपूर पाठोपाठ अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य मतदारसंघात विजय मिळवून भाजपनं महाविकास आघाडीला दुहेरी झटका दिला. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी ४४३ मतं मिळवून महाविकास आघाडीच्या गोपीकिसन बाजोरीया यांचा दणदणीत पराभव केला. आगामी काळात मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील इतर शहरांमध्ये महापालिका निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकींपूर्वी भाजपच्या विजयाचा हा ट्रेलर बघता महापालिका निवडणुकांच्या रणनितीवर महाविकास आघाडीला विशेष काम करावं लागणार हे मात्र नक्की…