VIDEO: ‘एकटीच राहतेस का?’ बाईक रायडरने तरुणीला घर सोडताच सुरू केली व्हॉट्सॲपवर घाणेरडी चॅट, व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

महिलांच्या सुरक्षेसाठी अनेकदा टॅक्सी किंवा बाईक टॅक्सी सोयीच्या वाटत असल्या तरी, गाझियाबादमध्ये घडलेल्या एका प्रकरणाने प्रवाशांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. एका रॅपिडो (Rapido) बाईक रायडरने तरुणीला तिच्या इच्छित स्थळी सोडल्यानंतर काही वेळातच व्हॉट्सॲपवर अश्लील आणि वैयक्तिक मेसेज करण्यास सुरुवात केली. या घटनेचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

अनुष्का नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने तिची आपबिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, रॅपिडोवरून प्रवास करून घरी पोहोचल्यानंतर तिला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप मेसेज आला. हा नंबर त्याच रायडरचा होता, ज्याने तिला काही वेळापूर्वी ड्रॉप केले होते. “एकटीच राहतेस का?” अशा आशयाचे प्रश्न विचारून रायडरने तिची वैयक्तिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला. अनुष्काने हे मेसेजेस अत्यंत भयानक आणि असुरक्षित वाटणारे असल्याचे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anushka_Official☀️ (@aanu_shka3)

 

डेटा सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. रायडरकडे तरुणीचा वैयक्तिक मोबाईल नंबर गेलाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सामान्यतः अशा ॲप्समध्ये नंबर मास्क करण्याची (नंबर लपवण्याची) सोय असते, तरीही रायडरकडे नंबर पोहोचल्याने डेटा प्रायव्हसी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर नेटकऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. राईड संपल्यानंतर कंपनीचे रायडर्सवर नियंत्रण नसते का, असा संतापही व्यक्त केला जात आहे.

रॅपिडो कंपनीचे स्पष्टीकरण आणि कारवाई

प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होताच रॅपिडो कंपनीने यावर तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने अनुष्काची सार्वजनिक रित्या माफी मागितली असून अशा प्रकारचे अनैतिक वर्तन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. संबंधित रायडरची आयडी आणि मोबाईल नंबर कंपनीने मागवला असून त्याच्यावर कठोर कायदेशीर आणि विभागीय कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अशा घटनांमुळे महिलांमध्ये प्रवासादरम्यान भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.