
वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जून महिन्याच्या पहिल्याच तारखेला सिलिंडरच्या दरात (LPG Cylinder Prices) मोठी कपात करण्यात आली आहे. नव्या दरानुसार 19 किलोग्रॅम व्यावसायिक सिलिंडरचे दर तब्बल 136 रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र, 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. (LPG Gas Cylinder Prices)
गेल्या महिन्यामध्ये घरगुती सिलिंडरच्या दरात दोन वेळा वाढ करण्यात आली होती. 7 मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात 50 तर 19 मे रोजी 3.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्याच तारखेला घरगुती सिलिंडरचे दर कमी होतील अशी अपेक्षा नागरिक बाळगून होते. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.
दुसरीकडे दिल्लीत कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सर्वाधिक कपात करण्यात आली आहे. दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरआज 136 रुपयांनी स्वस्त झाला आहे, दिल्लीपाठोपाठ कोलकत्त्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 133 रुपयांनी कमी झाल्या आहेत. याशिवाय, मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत तब्बल 135.50 किंमत रुपयांनी कमी झाली आहे.