राज्यातील बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. दरम्यान पहिल्याच पेपरमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. बोर्डाला आपली चूक लक्षात आली असून या गुणांची भरपाई मुलांना मिळण्याची शक्यता आहे. इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नाऐवजी चक्क उत्तरच देण्यात आले होते. तर इतर दोन प्रश्नांमध्ये प्रश्नाऐवजी तपासणाऱ्याला सूचना दिल्या आहेत. आता नेमकं काय उत्तर लिहावे? हे मुलांना कळायला मार्ग नव्हता. त्यांनी निरिक्षकांच्या ही बाब लक्षात आणून दिली आहे.
- प्रश्न क्रमांक ए 3 इंग्रजी कवितेववर आधारित असणे अपेक्षित होते मात्र येथे तपासणाऱ्याला सूचना छापून आल्या.
- ए 4 ला कवितेवर आधारित प्रश्न येणे अपेक्षित असताना त्याऐवजी उत्तरच तेथे देण्यात आले आहे.
- ए 5 हा प्रश्न देखील 2 गुणांचा होता. आणि येथे देखील प्रश्नाऐवजी तपासणाऱ्याला देण्यात येणाऱ्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे तिन्ही प्रश्न प्रत्येकी 2 गुणांसाठी विचारण्यात आले होते.
बोर्डाकडून या चुकीबाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमधील झालेल्या चुकांबाबत मुख्य नियमांची संयुक्त सभा पुन्हा एकदा आयोजित करण्यात येईल. मुलांना योग्य तो न्याय देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता १२ वी साठी एकूण तीन हजार 195 केंद्रांवर 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षा देणार असून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 3 लाख 21 हजार 396 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता यावी यासाठी मंडळामार्फत सप्टेंबर महिन्यात संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले, तर परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येऊन प्रवेशपत्र देखील ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात आले.
‘कोविड’च्या प्रादुर्भावानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून परीक्षा निकोप पार पडाव्यात, विद्यार्थ्यांचे परीक्षांबाबत दूरध्वनीद्वारे शंका समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय मंडळस्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सवलती देण्यात येत असून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.
परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाची मदत घेतली जाणार आहे.