
अकोला – महागाईची झळ सर्वसामान्यांबरोबर आता शेतकऱ्यांनाही (Farmer) बसू लागली आहे. औषधे, किटकनाशके तसेच रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता शासनाच्या महाबीज (Mahabeej) कंपनीने देखील बियाण्यांच्या दरात वाढ करून शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. महाबीजने सोयाबीन (Soybean) बियाणे दरात प्रतिकिलो 130 ते 145 रुपयांपर्यत वाढ केली आहे.
महाबीज अर्थातच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ दरवर्षी खरीप हंगामासाठी बियाण्यांचा सर्वाधिक पुरवठा करीत असते. महाबीजकडून बियाणे खरेदी करण्यास शेतकरी उत्सुक असतात. राज्यात आगामी हंगामासाठी बियाण्यांचा लवकरच पुरवठा सुरू होणार आहे. त्यादृष्टीने महाबीजने सोयाबीनसह इतरही बियाण्यांचे दर निश्चित केले आहेत.
यावर्षी महाबीजचे सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिकिलो 130 ते 145 रुपये जास्त द्यावे लागणार आहे. पेरणीच्या ऐन तोंडावरच सरकारच्या अधीन असणार्या महाबीज कंपनीने सोयाबीन बियाण्यांच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांची 30 किलोची बॅग 2230 रुपयांपर्यंत मिळत होती, मात्र यंदा हीच बॅग तब्बल दोन हजारांनी महाग झाली असून 3900 ते 4250 रुपयांना विकत घ्यावी लागणार आहे.