Big Bash League: सिडनी थंडर अवघ्या 15 धावांवर ऑल आऊट, टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या

WhatsApp Group

टी-20 क्रिकेटसारख्या फॉरमॅटमध्ये झंझावाती फलंदाजी पाहायला मिळते. या फॉरमॅटमध्ये फलंदाज धावांचा पाऊस पाडताना दिसत आहेत. पण असे अनेकवेळा दिसून आले आहे की संघ खूप लवकर आणि कमी स्कोअरवर ऑलआऊट होतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की संपूर्ण संघ केवळ 15 धावांवर कमी होऊ शकतो?

बिग बॅश लीगमध्ये आज 16 डिसेंबर रोजी खेळल्या गेलेल्या सिडनी थंडर विरुद्ध अॅडलेड स्ट्रायकर्स सामन्यात असेच काहीसे पाहायला मिळाले. अॅडलेड स्ट्रायकर्सच्या 140 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सिडनी थंडर मैदानात उतरला तेव्हा त्यांचा संपूर्ण संघ 5.5 षटकांत 15 धावांत सर्वबाद झाला. बिग बॅश लीगच्या इतिहासासोबतच टी-20 वर्ल्ड क्रिकेटमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी, T20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या 21 धावा होती, जी आयसीसी सहयोगी संघ तुर्की विरुद्ध चेक प्रजासत्ताक यांच्यातील सामन्यात दिसली होती.

दोन्ही संघांमधील बिग बॅश लीगमधील हा पाचवा सामना सिडनी शोग्राउंड स्टेडियम, सिडनी येथे झाला. या सामन्यात स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 139 धावा केल्या.प्रत्युत्तरात सिडनी थंडर जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा संघ 15 धावांत सर्व विकेट गमावेल असे कुणालाही वाटले नसेल. या सामन्यात सिडनी थंडरकडून पाच फलंदाज गोल्डन डकचे बळी ठरले, तसेच कोणताही खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकला नाही.

संघाकडून ब्रेंडन डॉगेटने सर्वाधिक 4 धावा केल्या. दुसरीकडे, अॅडलेड स्ट्रायकर्सकडून सामन्यात हेन्री थॉर्नटनने 5, वेस अगरने 4 आणि मॅथ्यू स्कॉटने 1 बळी घेतला.