Asia Cup 2022 : आसिफ अली आणि फरीद अहमदवर आयसीसीची मोठी कारवाई

WhatsApp Group

ICC Action on Asif Ali and Fareed Ahmad: 2022 आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानी फलंदाज आसिफ अली आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद मलिक यांच्यात हाणामारी झाली होती. दोन्ही संघांमधील सामना इतका तणावपूर्ण झाला की, आसिफ अली आणि फरीद अहमद यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. दरम्यान आता या घटनेवर आयसीसीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

या घटनेची दखल घेत आयसीसीने पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली आणि अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद मलिक यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने दोन्ही खेळाडूंना मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला आहे.

आयसीसीने म्हटले आहे की, आसिफने आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.6 चे उल्लंघन केले आहे. त्याच वेळी, फरीदने कलम 2.1.12 तोडले आहे जे खेळाडू, समर्थन कर्मचारी, पंच आणि सामनाधिकारी यांच्या अयोग्य शारीरिक वर्तनाशी संबंधित आहे. हे पाहता आयसीसीने दोन्ही खेळाडूंच्या मॅच फीच्या 25 टक्के इतका मोठा दंड ठोठावला आहे.

दुबईत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात रोमांचक सामना झाला. यादरम्यान, जिथे खेळाडू मैदानावर भांडताना दिसले, तिथे मैदानाबाहेर दोन्ही क्रिकेट संघाच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान स्टेडियममध्ये प्रचंड गोंधळ झाला आणि चाहते एकमेकांना लाथा मारताना आणि खुर्च्या फेकताना दिसले.

या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. सामना संपताच दोन्ही क्रिकेट संघाच्या चाहत्यांमध्ये हाणामारी पाहायला मिळाली. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा पराभव होताच चाहते संतापले आणि त्यांनी पॅव्हेलियनमध्ये ठेवलेल्या खुर्च्या उखडून फेकण्यास सुरुवात केली. यादरम्यान अफगाण क्रिकेट संघाच्या चाहत्यांनी खुर्च्या फोडल्या आणि त्या पाकिस्तानच्या चाहत्यांवर फेकण्यास सुरुवात केली.