Bhuvneshwar Kumar: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भुवनेश्वर कुमारने रचला इतिहास, टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

WhatsApp Group

India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-20 सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या मालिकेत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) उत्कृष्ट कामगिरी केली.  ज्यामुळं त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भुवनेश्वर कुमारने दमदार गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली. त्याने आफ्रिकन संघाविरुद्ध 4 सामन्यात 6 विकेट घेतल्या. त्याने मालिकेतील चार सामन्यांमध्ये 14.16 च्या सरासरीने आणि 10.4 च्या स्ट्राईक रेटने या विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

भुवनेश्वर कुमारने 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर चालू मालिकेत त्याने हे विजेतेपद पटकावले आहे. टी-20 क्रिकेटमध्ये दोनदा मालिकावीर पुरस्कार जिंकणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे. भुवनेश्वर कुमारने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकवले आहेत.

भुवनेश्वर कुमारने तिन्ही फॉरमेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज आहे. भुवनेश्वरने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 63 विकेट्स, एकदिवसीय क्रिकटेमध्ये 141 विकेट्स आणि टी-20 मध्ये 64 विकेट्स घेतल्या आहेत.