मुंबई : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास सचिन तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली असून उद्या त्यांच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे नियुक्त राहण्याची सहमती दर्शवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, सचिन तेंडुलकर आणि वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी उद्या दि. ३० मे २०२३ रोजी सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम होईल. सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची सर्वदूर व्याप्ती पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
राज्यात वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान‘ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने हे अभियान जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जात आहे.