देशातील बहुतांश राज्यातील जनतेला आजही कडक उन्हापासून दिलासा मिळण्याची आशा नाही. हवामान खात्याने पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, कोकण, गोवा, केरळ, माहे आणि अंतर्गत कर्नाटकात 30 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा
हवामान खात्याने महाराष्ट्रातील ठाणे, रायगड जिल्हे आणि मुंबईच्या काही भागांसाठी 27 ते 29 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. 27 आणि 28 एप्रिल रोजी तापमानाचा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील जळगाव येथे गुरुवारी 42.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या भागातील सर्वोच्च कमाल तापमान होते.
या राज्यातील लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार
हवामान विभागाच्या मते, 27 एप्रिल रोजी पंजाब, हरियाणा आणि पूर्व मध्य प्रदेशात काही ठिकाणी गारपीट, गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे (ताशी 40-50 किमी) वाहण्याची शक्यता आहे. पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे या राज्यांतील लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. त्याच वेळी, 29 एप्रिलपर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये गडगडाटासह तुरळक पाऊस पडेल. दरम्यान, 28 एप्रिल रोजी सिक्कीममध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिल्लीचे वातावरण
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत शुक्रवारी हंगामातील सर्वात उष्ण दिवस नोंदवला गेला जेव्हा पारा प्रथमच 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. मात्र, सायंकाळी सोसाट्याचा वारा व हलका पाऊस झाला. शनिवारी हवामान खात्याने अंशतः ढगाळ आकाश, गडगडाट आणि ताशी 25 ते 35 किमी वेगाने वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 39 आणि 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.