
मुंबई – आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू. मुंबईत आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामं करत आहोत. प्रवास हा विकासाचाही असायला हवा. त्या दृष्टीने आज जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून, मुंबईने करून दाखवलं आहे. लोकांच्या आयुष्यातही ईझ ऑफ लिव्हिंग आणण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.
मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम – बेस्टच्या “नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड” – एनसीएमसीचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
या सोहळ्यात ते बोलत होते. बेस्टच्या कुलाबा आगारातील ईलेक्ट्रीकल हाऊसच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर आदी उपस्थित होते.
बेस्टने एनसीएमसी-कार्ड सुविधेच्या माध्यमातून भारतातील कुठल्याही महानगरात नसेल अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याची अभिमानास्पद कामगिरी केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आज मी येथे बेस्टचं कौतुक करायला आलो आहे. आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामे करत आहोत. मी बेस्टच्या आयुष्याचाही प्रवास अनुभवला आहे. बेस्टचे अधिकारी, कर्मचारी नेहमीच पुढे चला.. पुढे चला म्हणूत अथकपणे लोकांच्या सेवेत असतात. कोरोनाच्या संकटातही एस.टी. आणि बेस्टने अलौकीक असे योगदान दिले आहे. माझा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला जातो. पण हे बिरुद माझ्या नावासमोर लागण्यासाठी माझ्या या कुटुंबातील तुम्हा सर्वांचे श्रेय आहे.
तुम्ही मेहनतीने बेस्टचं, मुंबई महापालिकेच्या कामाचं एक मॉडेल उभे केले आहे. या कामांचे कौतुक उच्च, सर्वोच्च न्यायालय आणि न्यू यार्क टाईम्सनेही केले आहे. या कार्डच्या सुविधेच्या माध्यमातून मुंबईकरांची सुट्ट्या पैश्यांची कटकट दूर केली आहे. उद्योगांच्या ईझ ऑफ डुईंग प्रमाणेच आपण नागरिकांच्या ईझ ऑफ लिव्हिंगचा – आयुष्याचा विचार करत आहोत. शेवटी प्रवास हा विकासाचाही असायला हवा.
त्यामध्ये आरोग्यासह, पर्यावरणाचाही विचार करत आहोत. प्रदूषण वाढते आहे, उष्णता वाढते अशी नुसती चर्चा करत नाही. तर त्यावर काम ही करत आहोत. त्यामुळेच पंतप्रधान कार्यालयाकडूनही आपल्या बस थांब्याच्या उपक्रमांची दखल घेतली गेली आहे. ज्यांच्या कष्टाच्या जीवावर, घामांवर केवळ राज्यच नव्हे, तर देशाची अर्थव्यवस्था उभी आहे. त्या मुंबईकरांसाठी आम्ही काम करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बेस्ट अनेक उपक्रमांत पहिल्या क्रमांकावर आहे. या उपक्रमासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, बेस्टने अत्यंत माफक दरात उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेनेही शिक्षण, आरोग्यात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. मुंबईतील महापालिकेच्या शाळेचा दर्जा हा आता अन्य शाळांत शिकणाऱ्या मुंलाच्या पालकांसाठीही आकर्षण ठरू लागले आहे.
मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गणवेशातील मुलांना बेस्टच्या बसने मोफत प्रवास करण्याची मुभा आहे. यापुढे खासगी शाळांतील मुलांसाठीही कमी दरातील बस पास सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. अन्य शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना जसे आपल्या मुलांनाही महापालिकेच्या जावे असे वाटू लागले आहे. असा या शाळांचा दर्जा आहे. त्याचप्रमाणे आता सर्वांना बेस्टने प्रवास करावे असे वाटेल. आम्ही जे करतो ते बेस्टच करतो, ते यापुढेही करत राहू. या जनतेसाठीच्या सेवेत ज्यांना-ज्यांना खासगी संस्थाना सेवा, ज्ञानाचे योगदान द्यायचे आहे, त्यांचे स्वागतच केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.