मुंबई : माजी सरन्यायाधीश, केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला 2024 या वर्षाचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. येत्या 11 जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इनमध्ये 15 व्या ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप कॅान्क्लेव्ह’मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार असून राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. ॲग्रीकल्चर टुडेच्या वतीने या पुरस्काराची सुरुवात सन 2008 पासून करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने मागील वर्षात पर्यावरणाच्या संरक्षणासह अन्नसुरक्षा, सर्वात मोठी बांबू लागवड, तृणधान्य अभियान, औष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर यांसारखे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले असून 1.7 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे 123 मेगा सिंचन प्रकल्प, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी दुप्पट करणारे देशातील पहिले राज्य, त्याचबरोबर 4.63 लाख शेतकऱ्यांना नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांचे वितरण, सूक्ष्म बाजरी कार्यक्रम, डाळींच्या उत्पादनात देशात अव्वल स्थान, तसेच एक रुपयात पीक विमा योजना राबवणारे देशातील एकमेव राज्य असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असून ग्रामीण कृषी क्षेत्रातील समृद्धीला लक्षणीय चालना मिळाली असल्याचे पुरस्कार समितीचे निष्कर्ष आहेत.
कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण धोरणे आणि उच्च प्रभावी विकासात्मक उपक्रमांद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे.
ॲग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेत प्रमुख भागधारकांचा मेळावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँड इत्यादी देशांचे राजदूत, तसेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड आदी राज्यांचे मंत्री यांचा समावेश असणार आहे.
सन 2008 पासून या पुरस्काराची प्रथम सुरुवात करण्यात आली असून कृषी क्रांतीचे प्रणेते प्रा. एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने सर्वात पहिल्यांदा हा पुरस्कार आंध्र प्रदेश या राज्याला प्रदान केला होता. आतापर्यंत या पुरस्काराने माजी कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, अखिलेश यादव, दिवंगत नेते प्रकाश सिंह बादल, वर्गीस कुरियन, एम. एस. स्वामिनाथन इत्यादी मान्यवरांचा गौरव करण्यात आलेला असून स्वामिनाथन यांनी दहा वर्ष या संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. सध्या डॉ. एम.जे. खान हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
2023 करिता सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार बिहार, तर 2022 करिता तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.