सोशल मीडियाच्या आभासी जगात ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी तरुण पिढी आजकाल कोणत्याही थराला जात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पश्चिम बंगालची प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर अखी रॉय (Akhi Roy) हिला बर्फाच्छादित डोंगरावर बॉलिवूड स्टाईलमध्ये साडी नेसून रील बनवणे चांगलेच महागात पडले. शून्य अंशापेक्षा कमी तापमान असलेल्या डोंगरावर केवळ एक पातळ साडी नेसून डान्स करताना अखीचा ऑक्सिजन स्तर (Oxygen Level) अचानक खाली घसरला आणि तिची प्रकृती गंभीर झाली.
सपनाच्या नादात जीवाला धोक्यात घातले
फेसबुकवर २३ लाख आणि इंस्टाग्रामवर ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या अखी रॉयने अलीकडेच डोंगराळ भागात फोटोशूटचे नियोजन केले होते. कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी सुरू असताना तिने केवळ एक लाल रंगाची साडी नेसून चित्रपट अभिनेत्रीसारखा डान्स करण्यास सुरुवात केली. मात्र, डोंगराळ भागात उंचीमुळे ऑक्सिजनची कमतरता असते, हे ती विसरली. काही वेळातच तिला तीव्र डोकेदुखी सुरू झाली आणि तिला चक्कर येऊ लागली. प्रकृती इतकी बिघडली की तिला श्वास घेणे कठीण झाले आणि ती बेशुद्ध पडू लागली.
वेळेवर ऑक्सिजन मिळाल्याने वाचला जीव
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, प्रकृती बिघडताच अखीला तातडीने जाड जॅकेट घालण्यात आले आणि जवळच असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीने तिला कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला. वेळीच उपचार मिळाले नसते तर हा हौसेचा प्रकार जीवावर बेतला असता. या घटनेनंतर अखीने स्वतः व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “बर्फात हिरोईन बनण्याचे असे फळ मिळेल असे वाटले नव्हते. पण माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ही जोखीम पत्करली.” तिच्या या विधानानंतर नेटिझन्सनी तिला कडाडून ट्रोल केले आहे.
सोशल मीडियावर टीकेची झोड
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर युजर्सनी अखीला चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. एका युजरने संताप व्यक्त करत म्हटले की, “लाईक्स मिळवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे ही बहादुरी नसून निव्वळ मूर्खपणा आहे.” दुसऱ्या एकाने उपहासाने म्हटले, “यमराजाला तुझा डान्स आवडला असता तर आज तिकीट फाडले गेले असते.” रील बनवताना किमान स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, असे मत अनेक सुज्ञ नागरिकांनी मांडले आहे.
