राहुल टेकेच्या खेळीने बीड जिल्हाने युवा कबड्डी सिरीज मध्ये पहिला विजय साकारला

WhatsApp Group

पुणे: रायगड जिल्हा विरुद्ध बीड जिल्हा यांच्यात पहिला दिवसाचा शेवटचा सामना झाला. बीड च्या संकेत चौधरीची पकड करत रायगड जिल्हाने पहिला गुण मिळवला. मात्र बीड संघाच्या खेळाडूंनी सांघिक खेळ करत 4-1 अशी आघाडी घेतली होती. त्याला राज जंगम ने चांगला प्रतिउत्तर देत पुढील 2 चढाईत 3 गुण मिळवत सामना बरोबरीत आणला. राज जंगम ने अष्टपैलू खेळ करत संघाला पहिल्या 10 मिनिटात 10-07 काही आघाडी मिळवून दिली होती.

बीड संघाकडून राहुल टेके ने चतुरस्त्र चढाया करत सामन्यात चुरस आणली होती. 13-13 असा सामना बरोबरीत असताना रायगड संघाचा एक खेळाडू शिल्लक होता. बीड संघाने प्रशांत जाधव ला बोनस देत त्याची पकड करून रायगड संघाला ऑल आऊट करत 16-14 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर मात्र राज जंगम ने आक्रमकता दाखवत मध्यंतरा पर्यत 20-18 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरा नंतर प्रशांत जाधव ने बीडच्या शिल्लक असलेल्या एका खेळाडूला बाद करत बीड संघाला ऑल आऊट करत 23-18 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर राज जंगम व प्रशांत जाधवच्या आक्रमक खेळीने रायगड संघाने आणखी एक लोण करत बीड संघाला 24-31असा पिछाडीवर टाकले.

बीडच्या राहुल टेके व शंकर मेघाने यांनी चतुरस्त्र चढायाच्या जोरावर शेवटच्या 10 मिनिटांत सामन्याला कलाटणी देत रायगड संघाला ऑल आऊट करत पुन्हा एकदा आघाडी मिळवत सामना फिरवला. 41-38 असा रायगड संघाचा पराभव करत बीड संघाने युवा कबड्डी सिरीज मधील आपला पहिला विजय मिळवला. राहुल टेके ने चढाईत 19 गुण मिळवत बीड जिल्ह्याच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली त्याला शंकर मेघाने ने चढाईत 10 गुण मिळवत चांगली साथ दिली. रायगड कडून राज जंगम व प्रशांत जाधव ने सुपर टेन पूर्ण केले मात्र उत्तरार्धात ते आपल्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

बेस्ट रेडर- राहुल टेके, बीड
बेस्ट डिफेंडर- राज जंगम, रायगड
कबड्डी का कमाल- शंकर मेघाने, बीड