‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयात कार्यक्षमपणे राबवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर : सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेला ‘सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम स्तुत्य असून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात हा उपक्रम कार्यक्षमपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ अंतर्गत विजेत्या कार्यालयास पारितोषिक वितरणाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी आमदार तानाजी सावंत, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर आणि पोषक असल्यास शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. याचा फायदा प्रशासनाला आणि सामान्य जनतेला होतो, यामुळे प्रशासनाचे काम सुलभ, पारदर्शी आणि गतिमान होण्यास मदत होवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण होते.
शासनाचे धोरणात्मक निर्णय समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी महसूल विभागाची आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महसूल विभाग कार्यक्षम असला पाहिजे. शासनाची अनुकूल प्रतिमा निर्माण करण्यासाठी दैनंदिन कामकाजात गतिमानता आली पाहिजे. शासन आणि प्रशासन सोबत मिळून काम केल्यास राज्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, राज्य प्रगतीपथावर जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ‘सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी, आदर्शवत ठरेल.