T20 WC 2024 : BCCI ने केली मोठी घोषणा, वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा पाऊस

WhatsApp Group

BCCI Prize Money Team India : टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. या शानदार विजयानंतर टीम इंडियावर पैशांचा पाऊस पडत आहे. ट्रॉफीसह कोट्यवधी रुपयांची बक्षीस रक्कम जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बक्षिसाची रक्कमही जाहीर केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याची घोषणा केली.

जय शाह यांनी लिहिले- आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 जिंकण्यासाठी टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन!

टीम इंडियाला आयसीसीने चमकदार ट्रॉफीसह 20.36 कोटी रुपये दिले आहेत. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना 6.54 कोटी रुपये दिले जातील.

टीम इंडिया दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन

भारतीय संघाने टी-20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने 59 चेंडूत सर्वाधिक 76 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावत 169 धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.