नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सर्वच गोष्टी महाग होत आहेत. आता नवीन 2022 वर्षात एटीएम वापरणेही महाग होणार आहे. आता, तुम्ही तुमच्या एटीएममध्ये दिलेल्या मोफत व्यवहारांपेक्षा ( free ATM transactions) जास्त व्यवहार केल्यास तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे बँकेला द्यावे लागणार आहेत.
1 जानेवारी 2022 पासून नवे दर होणार लागू
नव्या वर्षात रिझर्व्ह बँकेच्या ( Reserve Bank of india ) सूचनेनुसार मोफत व्यवहारांची मासिक मर्यादा संपल्यानंतर, बँक ग्राहकांना आता अधिक पैसे द्यावे लागतील. सध्या प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये दर आकारला जातो. 1 जानेवारी 2022 पासून, हे प्रति व्यवहार 21 रुपये होईल. हा व्यवहार आता आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांसाठी लागू असेल.
व्यवहार करताना कोणताही कर लागू असेल तर तो या शुल्कापासून वेगळा असेल, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे. म्हणजेच आतापर्यंत 20 रुपयांच्या शुल्काव्यतिरिक्त कर आकारणी केली जात होती. मात्र आता 21 रुपये शुल्क आणि लागू कर आकारला जाईल.
बँक ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या ATM मधून दर महिन्याला पाच व्यवहार मोफत करण्याची परवानगी दिली आहे. तर इतर बँकांकडून मोफत व्यवहाराची मर्यादा तुम्ही ज्या शहरात राहत आहात त्यावर अवलंबून असते. मेट्रो शहरांमध्ये राहणारे बँक ग्राहकांना इतर बँकेच्या एटीएम मधून दर महिन्याला तीन वेळा मोफत व्यवहार करण्याची मुभा आहे.
बँक ग्राहकांना दिलेल्या मोफत मर्यादेत गैर-आर्थिक व्यवहार देखील गणले जातात. म्हणजेच ATM मधून बॅलन्स चेक केल्यास किंवा मिनी स्टेटमेंट काढल्यास मोफत व्यवहारांची मर्यादाही कमी होईल. एटीएममध्ये जाऊन आपल्या डेबिड कार्डचा पिन बदलणे हा देखील एक व्यवहार म्हणून गणला जातो. भारतातील काही मोठ्या बँका त्यांच्या ग्राहकांना गैर-आर्थिक व्यवहारांवरील शुल्कातून सूट देतात.