टी-20 विश्वचषकावर संकटाचे सावट! बांगलादेशचा भारतात खेळण्यास स्पष्ट नकार; आयसीसीला पाठवले पत्र, क्रिकेट विश्वात मोठी खळबळ

WhatsApp Group

आगामी आयसीसी (ICC) पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या आयोजनावरून आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) भारतात होणाऱ्या या विश्वचषकासाठी आपला संघ पाठवण्यास अधिकृतपणे नकार दिला आहे. खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण पुढे करत बांगलादेशने हा टोकाचा निर्णय घेतला असून, यामुळे भारत आणि बांगलादेशमधील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. या संदर्भात बांगलादेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) एक खरमरीत पत्रही पाठवले आहे.

आणीबाणीच्या बैठकीत झाला मोठा निर्णय

भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहेत. मात्र, गेल्या २४ तासांतील बदलत्या राजकीय घडामोडींनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या संचालकांची एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय भूमीवर बांगलादेशी खेळाडूंना असलेल्या धोक्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बांगलादेश सरकारने दिलेल्या सल्ल्यानुसार, सध्याची परिस्थिती त्यांच्या खेळाडूंसाठी सुरक्षित नसल्याचा निष्कर्ष काढत बोर्डाने भारतात जाण्यास नकार दिला आहे.

आमचे सामने भारताबाहेर हलवा; BCB ची विनंती

आयसीसीला लिहिलेल्या पत्रात बांगलादेश बोर्डाने स्पष्ट मागणी केली आहे की, त्यांचे सर्व सामने भारताबाहेर इतर कोणत्याही देशात हलवण्यात यावेत. खेळाडू, अधिकारी आणि बोर्डाच्या सदस्यांच्या हिताचे रक्षण करणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे, असे बांगलादेशने म्हटले आहे. विशेष म्हणजे, विश्वचषकातील बांगलादेशचे पहिले तीन सामने कोलकात्यामध्ये होणार होते, परंतु आता या भूमिकेमुळे वेळापत्रकात मोठे बदल करावे लागण्याची शक्यता आहे.

मुस्तफिजुरची हकालपट्टी अन् वादाचा भडका

या वादाची ठिणगी आयपीएलमधील एका घटनेमुळे पडली आहे. बीसीसीआयच्या सूचनेवरून कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघातून बाहेर काढले. या घटनेनंतर बांगलादेशने आक्रमक पवित्रा घेतला असून, भारताकडून होणारा विरोध पाहता सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता आयसीसी या प्रकरणी काय भूमिका घेते आणि भारत याला कसे प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.