ढाका: शेजारील देश बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचाराची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. मध्य बांगलादेशातील कालीगंज भागात एका हिंदू विधवा महिलेसोबत घडलेल्या क्रूर घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. दोन नराधमांनी केवळ महिलेवर बलात्कारच केला नाही, तर तिला झाडाला बांधून तिचे केस कापले आणि या अमानवीय कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. या घटनेमुळे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा जागतिक स्तरावर ऐरणीवर आला आहे.
जमीन व्यवहारातून छळ आणि अमानवीय कृत्य
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने अडीच वर्षांपूर्वी शाहीन नावाच्या व्यक्तीकडून जमीन आणि घर विकत घेतले होते. तेव्हापासून शाहीन त्या महिलेवर वाईट नजर ठेवून होता. त्याने महिलेसमोर अश्लील प्रस्ताव ठेवले होते, ज्याला महिलेने कडाडून विरोध केला. शनिवार संध्याकाळी जेव्हा महिलेचे दोन नातेवाईक तिच्या घरी आले होते, तेव्हा शाहीन आणि त्याचा साथीदार हसन यांनी घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी ५० हजार टका (सुमारे ३७ हजार रुपये) खंडणीची मागणी केली.
झाडाला बांधून टॉर्चर आणि शुद्ध हरपेपर्यंत मारहाण
पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी महिलेच्या नातेवाईकांना मारहाण करून पळवून लावले. जेव्हा महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला, तेव्हा नराधमांनी तिला घराबाहेरील झाडाला बांधले आणि तिचे केस कापले. या संपूर्ण छळाचा व्हिडिओ त्यांनी शूट करून इंटरनेटवर टाकला. या क्रूरतेमुळे महिला शुद्ध हरपली. आसपासच्या लोकांनी तिला वाचवून जेनेदाह सदर रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला भीतीने गप्प बसलेल्या महिलेच्या वैद्यकीय तपासणीतून अत्याचाराची पुष्टी झाली, त्यानंतर शाहीन आणि हसन विरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हिंदूंच्या हत्यांचे सत्र सुरूच
ही एकच घटना नसून, बांगलादेशात गेल्या काही दिवसांत हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. शरियतपूर जिल्ह्यात खोकन चंद्र दास या हिंदू व्यक्तीला जमावाने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच २४ डिसेंबर रोजी अमृत मंडल नावाच्या हिंदू युवकाची जमावाने हत्या केली. १८ डिसेंबर रोजी दीपू चंद्र दास या २५ वर्षीय तरुणावर ईशनिंदेचा खोटा आरोप लावून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याचा मृतदेह झाडाला लटकवून जाळण्यात आला. मुहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार या घटनांना ‘सांप्रदायिक’ वळण नसल्याचे सांगत असले तरी, जमिनीवरची परिस्थिती अत्यंत भयानक आहे.
