शेजारील देश बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात रक्ताळलेली ठरली आहे. शरीयतपूर जिल्ह्यात एका ५० वर्षीय हिंदू व्यापाऱ्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खोकन चंद्र दास असे या दुर्दैवी व्यापाऱ्याचे नाव असून, दंगलीखोरांनी त्यांना प्रथम धारदार शस्त्रांनी जखमी केले आणि त्यानंतर जिवंत जाळले. गेल्या तीन दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या खोकन दास यांची प्राणज्योत अखेर आज, शनिवारी (३ जानेवारी) मालवली.
३१ डिसेंबरच्या रात्री ओढवला काळ
ही धक्कादायक घटना ढाकापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या शरीयतपूर जिल्ह्यातील दामुद्या उपनगरात घडली. ३१ डिसेंबर रोजी, जेव्हा जग नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत होते, तेव्हा रात्री ९:३० च्या सुमारास खोकन चंद्र दास आपले औषधांचे दुकान आणि मोबाईल बँकिंगचे काम आटोपून घराकडे निघाले होते. वाटेत दबा धरून बसलेल्या आंदोलकांच्या एका हिंसक जमावाने केउरभंगा बाजार परिसरात त्यांना गाठले आणि हल्ला चढवला.
अमानुष छळ आणि पेट्रोलचा वापर
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी प्रथम खोकन दास यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. जेव्हा खोकन दास अर्धवट बेशुद्ध अवस्थेत खाली पडले, तेव्हा हिंस्त्र जमावाचे समाधान झाले नाही; त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. या भीषण आगीत खोकन दास गंभीर भाजले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु ७० टक्क्यांहून अधिक भाजल्यामुळे आणि जखमांमुळे अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली.
हिंदू समाजात दहशतीचे वातावरण
खोकन दास हे त्यांच्या भागात एक शांतताप्रिय व्यापारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या हत्येनंतर स्थानिक हिंदू समुदायामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. बांगलादेशात सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात असून, त्यांच्या घरांची आणि दुकानांची जाळपोळ केली जात आहे. या ताज्या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही संताप व्यक्त केला जात असून, बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
