बांगलादेशने रचला इतिहास; पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या मैदानावर केले पराभूत

WhatsApp Group

बांगलादेश क्रिकेट संघाने त्यांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (SA vs BAN) सुरुवात केली आहे. बांगलादेशने सेंच्युरियन येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शानदार कामगिरी करणारा बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर हा पहिला विजय आहे.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली आणि सलामीवीरांनी 95 धावांची भागीदारी केली. कर्णधार तमीम इक्बाल 41 धावांची खेळी खेळून बाद झाला, तर दुसरा सलामीवीर लिटन दासने अर्धशतक झळकावल्यानंतर त्याची विकेट गमावली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शाकिबने जलद धावा केल्या आणि 64 चेंडूत 77 धावांची खेळी खेळून बाद झाला.

आपल्या खेळीत सात चौकार आणि तीन षटकार ठोकणाऱ्या शकीबने यासिर अली (50) सोबत चौथ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. खालच्या क्रमवारीतही फलंदाजांनी छोटे पण महत्त्वाचे योगदान दिले आणि त्यामुळेच बांगलादेशने 314/7 अशी चांगली धावसंख्या उभारली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को येनसेन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि 36 धावांपर्यंत त्यांचे तीन गडी बाद झाले. कर्णधार टेंबा बावुमा (31) आणि रेसी व्हॅन डर ड्युसेन यांनी चौथ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. 86 धावा करून डुसेन 38व्या षटकात बाद झाला.

डेव्हिड मिलरची झंझावाती खेळी व्यर्थ गेली

डेव्हिड मिलरने 57 चेंडूत 79 धावांची जलद खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही 46 व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. सरतेशेवटी केशव महाराज (23) आणि लुंगी एनगिडी (15*) यांनीही प्रयत्न केले पण ते लक्ष्यापासून दूर गेले. बांगलादेशकडून मेहदी हसनने सर्वाधिक चार बळी घेतले, तर तस्किन अहमदनेही तीन बळी घेतले.