ठाणे : 40आमदार, 12 खासदार, अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांना आपल्या बाजूने वळवून घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहाय्यक आणि निकटवर्ती चंपासिंह थापा Champa singh Thapa यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थापा यांनी आपला पाठिंबा जाहीर केला.
चंपासिह थापा यांचे शिंदे गटात जाणे हे राजकीयदृष्ट्या धक्कादायक नसले तरी ठाकरे कुटुंबासाठी हा कुप मोठा धक्का आहे. चंपासिंह थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला एक भावनिक किनार आहे कारण थापा यांना बाळासाहेबांची सावली असं म्हटले जात होते. बाळासाहेबांचा विश्वासू सेवक म्हणून चंपासिंह थापाकडे पाहिले जात होते. चंपासिंह थापा हे नेपाळचे असून 30 वर्षापूर्वी मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी छोटी-मोठी कामे करत होते.
थापा यांची पहिली प्रतिक्रिया
नवरात्रीचा पहिला दिवस अत्यंत शुभ आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आलो. ठाण्यातील टेंभी नाका देवीचं दर्शन घेतलं. आता मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार आहे. शिंदे साहेब जे आदेश देतील, ते मी पाळणार, अशी प्रतिक्रिया थापा यांनी शिंदे गटात प्रवेशानंतर व्यक्त केली.