राणे पिता-पुत्रांच्या अडचणी वाढल्या; नितेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

WhatsApp Group

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकालापूर्वीच राणे कुटुंबीयांची मोठी कोंडी होताना दिसत आहे. एकीकडे नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे, तर नारायण राणेंना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणात रोज नवनव्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. याप्रकरणी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने आमदार नितेश राणेंना मोठा धक्का दिला आहे. परब हल्लाप्रकरणी दाखल नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. राणेंचे वकील आता उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. अटकेच्या भीतीनं गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या ठावठिकाण्याबाबत नारायण राणेंना एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, ‘नितेश राणे कुठे आहेत हे तुम्हाला मी का सांगू, ते सांगायला मी मूर्ख आहे का? असं राणे म्हणाले होते. नेमकं हेच वक्तव्य त्यांना भोवलेलं आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी त्यांना कणकवली पोलिसांनी ठाण्यात हजर होण्यास सांगितलं आहे. दरम्यान, ६५ वर्षांवरील व्यक्तींची साक्ष त्यांच्या घऱी जाऊन घ्यावी लागते. त्यामुळे नारायण राणेंना नोटीस बजावणं अपराध असल्याचा पलटवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा उद्या निकाल आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच राणे आणि शिवसेनेचे संबंध ताणले गेले आहेत. दरम्यान, ज्या बँकेवर ताबा मिळवण्यासाठी नारायण राणेंनी आपली राजकीय ताकद पणाला लावली, त्याच बँकेच्या निवडणुकीत नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. नितेश राणेंनी जिल्हा बँकेचे १६ कोटी रुपये थकवल्यानं सहकार विभागानं त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं.

वादाची ठिणगी कुठे पडली?

१८ डिसेंबरला शिवसेनेचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. परब सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या गोटातले असल्यानं या घटनेला राजकीय वळण लागलं. याप्रकरणी आत्तापर्यंत मुख्य आरोपी सचिन सातपुतेसह ४ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणी नितेश राणेंची कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीही झाली. तेव्हापासूनच नितेश राणे नॉट रिचेबल आहेत.

एकुणच विधानभवन परिसरातील ‘म्याव म्याव’ची टिंगल नितेश राणेंना चांगलीच महागात पडत असल्याचं चित्र आहे. २००५ साली नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासूनचं राणे आणि शिवसेनेमधील राजकीय वैर नव्या पिढीतही कायम आहे. पेग्विन, सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणावरुन अनेकदा राणे कुटुंबीयांनी ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अवमानावरुन नारायण राणेंना अटक होण्याची घटना ताजीच असताना नितेश राणेंवरही अटकेची तलवार आहे. आगामी काळात सिंधुदुर्गात जिल्हा परिषद निवडणुका आहेत. त्यामुळे ही राजकीय लढाई येत्या काळात आणखी तीव्र होणार यात शंका नाही.

– रेणुका शेरेकर