भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणतात की, जर पाकिस्तानचा संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध होणार्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 2048 मध्ये आपल्या देशाचा पंतप्रधान बनू शकतो. पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर इंटरनेट मीडियावर विविध विनोद शेअर करण्यात आले आणि आता भारताचे माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनीही यावर भाष्य केले आहे. सुनील गावस्कर म्हणाले, ‘तुम्हाला माहिती आहे का, जर पाकिस्तानने वर्ल्ड कप जिंकला तर 2048 मध्ये बाबर पाकिस्तानचा पंतप्रधान होईल.’ स्टार स्पोर्ट्सच्या गेम प्लॅन शोमध्ये गावस्कर यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे 1992 मध्येही फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना इंग्लंडशी झाला होता.
सुनील गावसकर यांनी असं का म्हटलं तर याचं कारण 1992 मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि नंतर इम्रान खान यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ते पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. आता पुन्हा एकदा 2022 मध्ये तीच परिस्थिती समोर आली आहे जेव्हा टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) November 10, 2022
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना रविवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. बाबर आझम आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरला तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेता बनेल. 2009 मध्ये पाकिस्तानने पहिल्यांदाच टी-20 विश्वचषक जिंकला होता, तर इंग्लंडच्या संघानेही एकदाच हे विजेतेपद पटकावले आहे. म्हणजेच, इंग्लंड आणि पाकिस्तानला दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची मोठी संधी आहे आणि जो संघ हे विजेतेपद जिंकेल तो वेस्ट इंडिजच्या विक्रमाची बरोबरी करेल. वेस्ट इंडिजने दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकला आहे.