
जगप्रसिद्ध अंध भविष्यवाणीकारिणी बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. बुल्गेरियातील या दिवंगत भविष्यवेत्त्या महिलेनं अनेक दशकांपूर्वी भविष्यातील घडामोडींविषयी केलेल्या भाकितांनी जगभरात खळबळ उडवली होती. आता त्यांच्या आणखी एका भविष्यवाणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या मते, 2026 ते 2028 या कालावधीत जगात अभूतपूर्व बदल घडतील.
वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, या काळात जागतिक स्तरावर दुष्काळ आणि भूकबळीच्या समस्यांचा शेवट होईल. आज जगातील अनेक देश अन्नधान्याच्या टंचाईने आणि उपासमारीने त्रस्त आहेत, परंतु तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणीय सुधारणा आणि कृत्रिम अन्न उत्पादनातील नवकल्पना यांमुळे ही स्थिती पूर्णपणे बदलणार आहे. मानवजातीला अन्नासाठी संघर्ष करावा लागणार नाही, असा त्यांनी दावा केला आहे.
याच कालावधीत चीन आर्थिक आणि लष्करी शक्तीच्या बाबतीत अमेरिकेलाही मागे टाकेल, अशी धक्कादायक भाकीत त्यांनी केली आहे. जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात येईल आणि चीन नव्या जागतिक नेत्याच्या भूमिकेत उभा राहील. व्यापार, तंत्रज्ञान, अवकाश आणि लष्करी क्षेत्रात चीनचे सामर्थ्य वाढेल, असा वेंगा यांचा अंदाज आहे.
वेंगा यांच्या मते, या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी प्रगती होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवी ऊर्जा साधने, वैद्यकीय विज्ञान आणि अवकाश संशोधनात मोठी झेप घेतली जाईल. मानवाने अन्य ग्रहांवर जीवनसदृश शक्यता शोधण्यातही यश मिळवण्याची चिन्हे आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे.
तथापि, या सकारात्मक घडामोडींमध्येही वेंगा यांनी एक भयावह इशारा दिला आहे. त्यांच्या मते, या काळात तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मोठ्या राष्ट्रांमध्ये तणाव वाढू शकतो, सायबर हल्ले, आर्थिक युद्धे आणि आण्विक धमक्या या स्वरूपात संघर्ष उभा राहू शकतो. मात्र, त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की या संघर्षातून मानवजातीला नवे धडे मिळतील आणि अखेरीस शांततेचा मार्गच निवडला जाईल.
बाबा वेंगा यांच्या या भविष्यवाण्या नेहमीप्रमाणेच गूढ आणि विचार करायला लावणाऱ्या आहेत. 2026 ते 2028 या काळात खरोखरच हे भाकीत सत्य ठरेल का, हे पाहणे आता सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.