काँग्रेसला मोठा झटका; 3 वेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा

0
WhatsApp Group

मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाला धक्के बसत आहेत. अनेक बडे नेते पक्ष सोडत आहेत. नुकतेच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असलेले बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे.

48 वर्षांचा प्रवास संपला

पक्षातून बाहेर पडल्याची घोषणा करताना बाबा सिद्दीकी यांनी ट्विटरवर लिहिले, मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झालो. गेल्या 48 वर्षांचा काँग्रेस सोबतचा माझा महत्त्वाचा प्रवास राहिला आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला या प्रवासाबद्दल बोलायला खूप आवडले असते. पण ते म्हणतात ना काही गोष्टी न सांगितल्या बऱ्या. माझ्या या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.

यापूर्वी 14 जानेवारी रोजी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून बाबा सिद्दीकीही लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आज त्यांनी स्वतः पक्ष सोडण्याची घोषणा केली.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश 

आता काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे मानले जात आहे. अलीकडेच बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान यानेही अजित पवार यांची भेट घेतली होती. बाबा सिद्दीकी हे वांद्रे विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत आणि ते महाराष्ट्रातील मोठ्या मुस्लिम चेहऱ्यांपैकी एक आहेत.