ऑस्ट्रेलियाने उडवला बांगलादेशचा धुव्वा, अवघ्या 73 धावांत केलं ‘ऑल आउट’

WhatsApp Group

दुबई – टी-20 विश्वचषकात गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अ‍ॅडम झाम्पाच्या धमाकेदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने बांगलादेशला अवघ्या 73 धावांत गुंडाळले. झाम्पाने 4 षटकांत 19 धावांत 5 बळी मिळवले. तर धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने हा सामना अवघ्या 6.2 षटकांमध्ये खिशात घातला. या दमदार विजयामुळे ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या नेट रन रेटमध्ये कमालीची सुधारणा केली आहे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पॉइंट टेबलमध्ये खाली सारत दुसरं स्थान मिळवलं आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. बांगलादेशचा एकही फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. बांगलादेशकडून मोहम्मद नईम (17), कर्णधार महमुदुल्ला (16) आणि शमीम हुसेन (19) हे तीनच फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले.


कांगारू संघाकडून कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने 20 चेंडूंत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 40 धावांची वादळी खेळी केली तर, डेव्हिड वॉर्नरने 14 चेंडूत 18 धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 58 धावांची भागिदारी केली. बांगलादेशने दिलेले सोपं आव्हान ऑस्ट्रेलियाच्या संघाने 6.2 षटकात 2 विकेट गमावत पूर्ण केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाचे पहिल्या गटातील दुसरे स्थान अधिक भक्कम झाले आहे.


ऑस्ट्रेलियाचे आता चार सामन्यांत दक्षिण आफ्रिकेएवढे 6 समान गुण झाले आहेत. मात्र, चांगल्या नेट रन रेटमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या पुढे म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट 1.031 एवढा असून, दक्षिण आफ्रिकेचा रन रेट 0.742 एवढा आहे. इंग्लंडचा संघ चार सामन्यांत आठ गुणांसह गटात पहिल्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेश संघाचा हा सलग पाचवा पराभव ठरल्याने ते यंदाच्या आयसीसी टी-20 विश्वचषकामधून बाहेर पडले आहेत.