ऑस्ट्रेलियाने उडवला इंग्लंडचा धुव्वा, ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाची ३-० ने विजयी आघाडी

WhatsApp Group

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲशेस कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाची लाजीरवाणी कामगिरी सुरूच आहे. त्यामुळेच इंग्लंडचा मेलबर्नमध्ये कसोटी सामन्यात मोठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला आणि त्यांना लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ॲशेस मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या १८५ धावांवर आटोपला. तर दुसरा डाव अवघ्या ६८ धावांवर आटोपला. क्रिकेटविश्वात दिग्गज संघ अशी ओळख मिळवणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला या वर्षी कसोटीत तब्बल १३ वेळा २०० धावसंख्या पार करता आली नाही.

इंग्लंडला पहिला धक्का दुसऱ्याच षटकात बसला. संघात पुनरागमन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने हमीदला खातेही उघडू दिले नाही. जॅक क्रोली (१२) आणि मलान (१४) हे देखील कमिन्सचे बळी ठरले.कर्णधार जो रूटने (५०) पुन्हा एकदा संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. ५३ वे अर्धशतक झळकवल्यानंतर तो स्टार्कच्या चेंडूवर तंबूत परतला. यासह रूटच्या नावे आता एका कॅलेंडर वर्षांत कर्णधाराच्या भूमिकेत सर्वाधिक धावांची नोंद झाली. बेन स्टोक्स (२५) आणि जॉनी बेअरस्टो (३५) काही काळासाठी खेळपट्टीवर स्थिरावले, पण त्यांना मोठी खेळी खेळता आली नाही. पहिल्या दिवसाच्या ६६ व्या षटकात पाहुण्या संघाचा डाव ढेपाळला, ऑस्ट्रेलियाकडून कमिन्स आणि लियनने ३-३ तर स्टार्कने २ गडी बाद केले.

सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला वेगवान सुरुवात करून दिली. डेव्हिड वॉर्नर ४२ चेंडूत ३८ धावांवर दिवस संपण्याच्या एक षटकाआधी तंबूत परतला. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने १ बाद ६१ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव २६७ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियासाठी हॅरिसने सर्वाधिक ७६ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या इंग्लंडची सुरुवात पुन्हा निराशाजनक झाली. सामन्याचा दुसरा दिवस संपला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या ४ बाद ३१ अशी आहे. मात्र तिसरा दिवस सुरू होताचा इंग्लंडचे विकेट्स जायला सुरुवात झाली आणि अवघ्या ६८ धावांवर इंग्लंडचा दुसरा डाव आटोपल्याने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १४ धावांनी हा कसोटी सामना जिंकला.

पहिल्या दोन्ही  सामन्यांप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही इंग्लंडला लवकर माघारी धाडून ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-० ने आपल्या नावावर केली आहे. यापूर्वी झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार विजय मिळवला आहे. या पराभवांचा फटका इंग्लंड संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही बसणार आहे. सध्या WTC क्रमवारीत सातव्या स्थानी आहे. मात्र ॲशेस मालिकेतील तिसरा सामनाही इंग्लंड हरल्याने त्यांना क्रमवारीत मोठा फटका बसणार आहे.