तिसऱ्या कसोटीतील पराभवाने भारताच्या अडचणी वाढल्या, ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश

WhatsApp Group

इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 च्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन करत टीम इंडियाचा 9 विकेट्सने पराभव केला. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर आता कांगारू संघाने मालिकेत आपले खाते उघडून 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, या पराभवाचा टीम इंडियाच्या मालिका विजय किंवा पराभवावर कोणताही परिणाम होणार नसून, या पराभवामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबाबत अडचणी वाढल्या आहेत. भारताला ICC World Test Championship फायनल खेळायची असेल तर शेवटचा सामना जिंकावा लागेल, तर या विजयासह कांगारू संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले आहे Australia qualifies for WTC final. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ९ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

या सामन्याबद्दल थोडक्यात सांगायचे तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण संघ 3 तासही फलंदाजी करू शकला नाही आणि 33.2 षटकात 109 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 197 धावा केल्या आणि 88 धावांची आघाडी घेतली. यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या डावातही काही विशेष करता आले नाही. चेतेश्वर पुजाराच्या ५९ धावाशिवाय कोणीही फार काही केले नाही. संपूर्ण संघ दुसऱ्या डावातही 163 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी केवळ एक विकेट गमावून पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेडने नाबाद 49 आणि मार्नस लबुशेनने 28 धावा केल्या.


या सामन्यात नॅथन लियॉन ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला, त्याने एकूण 11 विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात 8 बळी घेतले. त्याच्याशिवाय पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात एक विकेट घेणाऱ्या मॅट कुहनेमननेही मोलाचे योगदान दिले. या सामन्यात भारतीय फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात जडेजाने 4 तर उमेश आणि अश्विनने 3-3 बळी घेतले. दुसऱ्या डावात लक्ष्य खूपच लहान होते पण दिवसाच्या सुरुवातीलाच अश्विनने ख्वाजाला दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद केले. यानंतर हेड आणि लबुशेनने चुका न करता आपल्या संघाला विजयापर्यंत नेले.

टीम इंडियाला चौथी कसोटी जिंकावीच लागेल : नागपुरात एक डाव आणि 132 धावांनी आणि नंतर दिल्लीत 6 गडी राखून पराभूत झाल्यानंतर कांगारू संघाने इंदूरमध्ये 9 गडी राखून विजय मिळवत शानदार पुनरागमन केले आहे. आता मालिका 2-1 अशी बरोबरीत पोहोचली आहे. हा सामना जिंकून पाहुण्यांनी केवळ मालिकेत टिकून राहण्याचा दावा केला नाही तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही आपले स्थान निश्चित केले आहे. फायनल लंडनमधील ओव्हल येथे ७ जून ते ११ जून या कालावधीत होणार आहे. आता दुसऱ्या संघाची शर्यत भारत आणि श्रीलंका यांच्यात आहे. आपले स्थान पक्के करण्यासाठी टीम इंडियाला शेवटचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघाला न्यूझीलंड दौऱ्यावरील दोन्ही सामने जिंकण्याची इच्छा आहे.