विश्वचषकाचा 18 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 367 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 305 धावांवर ऑलआऊट झाला होता. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी बाबर आझमचा निर्णय चुकीचा ठरवला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी 259 धावांची उत्कृष्ट भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली.
मात्र, त्यानंतर पाकिस्तान संघाने शानदार पुनरागमन केले आणि शाहीन शाह आफ्रिदीने पाच बळी घेतले. शाहीनसह पाकिस्तानच्या सर्व गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ 50 षटकात 9 विकेट गमावून 367 धावा करू शकला, तर एके काळी त्यांचा संघ 400 पेक्षा जास्त धावा करू शकेल असे वाटत होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक धावा केल्या. वॉर्नरने 163 धावांची शानदार शतकी खेळी खेळली. त्याच्याशिवाय मिचेल मार्शनेही 121 धावांची शतकी खेळी खेळली. या दोघांशिवाय ऑस्ट्रेलियन खेळाडूला 25 धावांचीही खेळी खेळता आली नाही.
View this post on Instagram
दुसरीकडे पाकिस्तान संघानेही दमदार सुरुवात केली. अब्दुल्ला शफीक आणि इमाम-उल-हक यांच्यात पहिल्या विकेटसाठी 134 धावांची शानदार भागीदारी झाली. शफीकने 64 धावांची तर इमामने 70 धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय मोहम्मद रिझवानने 46 धावांची, सौद शकीलने 30 धावांची आणि इफ्तिखार अहमदने 26 धावांची खेळी खेळली. याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानची फलंदाजी पाहून त्यांचा संघ लक्ष्य गाठू शकेल असे वाटत होते, मात्र ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पाने हे होऊ दिले नाही. अॅडम झाम्पाने 10 षटकांत 53 धावा देत 4 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. झम्पाने बाबर आझम, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाज यांची विकेट्स घेतल्या.