पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाची टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक!

WhatsApp Group

दुबई –  आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव ( Australia won by 5 wkts ) करत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी ( australia vs new zealand) होणार आहे. या दोन्ही संघात रविवारी १४ नोव्हेंबरला टी 20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.

खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या षटकांमध्ये मॅथ्यू वेडने केलेल्या १७ चेंडूत नाबाद ४१ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने विजय मिळवला.

पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवानने ५२ चेंडूत ६७ तर फखर जमान ३२ चेंडूत नाबाद ५५ धावा करत अर्धशतकी खेळी केली. या दोघांसह कर्णधार बाबर आझमने ३९ धावांची खेळी केली. या तिघांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तान ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७७ धावांचे आव्हान देऊ शकला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक २ तर अ‍ॅडम झम्पा आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला.

१७७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरेलेल्या ऑस्ट्रेलियासाठी डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ४९, मॅथ्यू वेडने नाबाद ४१ आणि स्टॉइनिसने नाबाद ४० धावा केल्या. पाकिस्तानसाठी शादाब खानने शानदार गोलंदाजी करत ४ षटके टाकताना २६ धावा देत ४ बळी टीपले.

यंदा टी२० क्रिकेटला मिळणार नवा विश्वचषक

ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्यांदा आयसीसी टी २० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठत आहे. तर न्यूझीलंड पहिल्यांदाच अंतिम फेरी खेळेल. विशेष म्हणजे या दोन्ही संघानी आजवर एकदाही टी २० विश्वचषक जिंकला नाहीये. त्यामुळे यंदा आपल्याला टी २० क्रिकेटचा नवा विश्वविजेता पाहायला मिळणार आहे.