औरंगाबाद – शहरामध्ये क्रांती चौक येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येत आहे. त्यासाठी शिवप्रेमी आणि सर्वच राजकीय पक्षांनी शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते. मात्र औरंगाबाद महानगरपालिकेच्या पथकाकडून मध्यरात्री शिवजयंतीसाठी लावण्यात आलेले बॅनर काढण्यात आले.
या घटनेमुळे मध्यरात्री शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवप्रेमींनी क्रांती चौकात धाव घेतली. शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख, भाजप नेते राजू शिंदे, मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासह अनेक शिवप्रेमींनी क्रांती चौकात धाव घेतली. तसेच मनपाच्या कारवाईवरून आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केली आणि मनपा पथकाने काढता पाय घेतल्याने विषय मिटला.