
सांगली : काल आटपाडी येथील एका हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील एका पेशंटवर एका तथाकथित धर्मगुरूने तंत्र मंत्र, प्रार्थनेचा उपचार केला. याचा व्हिडिओ आज दिवसभर समाजमाध्यमांवर तसेच काही न्यूज चॅनेल वर आला आहे.
तंत्र मंत्राने, प्रार्थनेने रोग बरे करणे, दैवी शक्तीच्या साहाय्याने रोग बरा करण्याचा दावा करणे, हा जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे, तसेच वैद्यकीय क्षेत्रात असे अशास्त्रीय, जादुई उपचार करणे हा ‘ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमिडीज अॅक्ट’ नुसार ही गुन्हा आहे.
सांगली जिल्हा प्रशासनास आमची विनंती आहे की, या तथाकथित धर्मगुरू वर वरील दोन्ही कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. तसेच जनतेस आवाहन आहे की, सध्या वैद्यकशास्त्रात प्रचंड प्रमाणात शास्त्रीय संशोधन झाले आहे, तेव्हा अशा अशास्त्रीय अंधश्रद्धेच्या उपचार पद्धतीवर विश्वास ठेवू नये.