Asian Games 2023: चक दे इंडिया! पहिल्याच सामन्यात भारताकडून सिंगापूरचा 13-0 ने पराभव

WhatsApp Group

भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेला धमाकेदार सुरुवात केली आहे. सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्या सामन्यात सिंगापूरचा 13-0 असा पराभव केला. भारताकडून संगीता कुमारीने 3 गोल केले. भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. मलेशिया, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि सिंगापूरसह भारतीय संघाला पूल-अ मध्ये स्थान देण्यात आले आहे.

सिंगापूरचा सलग दुसरा पराभव 

या पूलमधील पहिल्या सामन्यात मलेशियाने हाँगकाँगचा 8-0 असा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियाने सिंगापूरचा 4-0 असा पराभव केला. आता भारतीय संघाने सिंगापूरचा 13-0 अशा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. अशाप्रकारे सिंगापूर संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. वास्तविक, भारतीय महिला हॉकी संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदक जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा आशा भारतीय चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

संगीता कुमारीने हॅट्ट्रिक करत भारताला मोठा विजय मिळवून दिला

भारत-सिंगापूर सामन्याबद्दल बोलायचे झाले तर उदिताने पहिला गोल केला. यानंतर दीपिकाने गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमण सुरूच ठेवले. विशेषत: संगीता कुमारीने हॅट्ट्रिक गोल नोंदवून भारतीय संघाला मोठा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, आता यानंतर भारतीय हॉकी संघाला पूल सामन्यात मलेशिया, दक्षिण कोरिया आणि हाँगकाँगचा सामना करावा लागणार आहे. आज सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सौदी अरेबियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. अंतिम-16 फेरीतील भारताचा हा पहिलाच सामना असेल.